STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

इस्राएल मधील आधुनिक शेती

*इस्रायल मधील शेती*
........✍🏻

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील वातावरण शेतकरी संपामुळे ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर इस्राएलच्या शेतीविषयीची माहिती सर्वांनाच उपयोगी पडेल.

१. इस्राईलमध्ये शेती हा इतर उद्योगांसारखाच एक उद्योग समजला जातो. त्यामुळे त्यासाठी नफा-तोटा आखला आणि जोखलाही जातो. 'बळीराजा' , 'काळी आई' वगैरे भावनिक गुंत्यात न अडकता शेती ही इंडस्ट्री समजली जाते.

२. इस्राएल आपल्याबरोबरच म्हणजे 1948 मध्ये स्वतंत्र झाला. ते राष्ट्र कसे उभे राहिले हा इतिहासाचा विषय आहे. मात्र हे स्वातंत्र्य मिळणे सोपे नव्हते हे खरे! इस्राएलचे क्षेत्रफळ आहे 20,770 वर्ग किमी आणि महाराष्ट्राचे आहे सुमारे तीन लाख वर्ग किमी पेक्षा ही जास्त! म्हणजे महाराष्ट्रचे क्षेत्रफळ इस्राएलपेक्षा सुमारे 14 पट जास्त आहे.

३. *इस्राएलचा अर्ध्याहून जास्त भाग वाळवंटी असल्याने तिथे पाऊस नाही. बाकी जिथे पडतो तिथे अतिशय कमी पडतो. कुठे 28 इंच तर कुठे एक इंचापेक्षाही कमी पडतो. मात्र पडलेल्या पावसापैकी 75% पाणी अडवले, जिरवले जाते. त्यासाठी बंधारे, कालवे, पाईपलाईन, पंपिंग स्टेशन आणि नॅशनल वॉटर कॅरीअर प्रकल्प असे मोठे जाळे उभारले आहे. शिवाय समुद्राचे खारे पाणी गोड करून वापरता येईल असे प्रयत्नही चालू आहेत.*

अतिशय कमी पाण्यावर शेती कशी करता येईल याचा अभ्यास करून या देशाने अनेक उत्तम पद्धती शोधून काढल्या आहेत.

४. शेती 2 प्रकारे केली जाते. एक म्हणजे कुटुंबाकडे असलेली शेती आणि दुसरी म्हणजे सहकारी/ सामुदायिक शेती. दोन्ही प्रकारच्या शेतीत लोक तेवढेच कष्ट घेतात. शेतीला प्रोडक्शन कोटा दिला जातो. शिवाय पाण्याचाही कोटा दिला जातो. कुणालाही हवे तिथे बोअर खणून किंवा कालव्यातून पाईप टाकून अधिक प्रमाणात पाणी घेता येत नाही!

५. दर वर्षी देशाला किती शेतमालाची गरज पडेल याचे हिशेब केले जातात. किती अन्नधान्य देशात हवे आहे आणि किती एक्स्पोर्ट करायचे आहे हे ठरवले जाते. त्यानुसार शेतीला कोटा ठरवून दिला जातो. हा कोटा प्रत्येक पीक, भाज्या, फळे आणि शिवाय दूध व पोल्ट्री यांनाही लागू असतो! त्यामुळे भाव स्थिर राहतात.

६. विनाकारण अधिक उत्पन्न होऊन ते खराब व्हावे किंवा तोट्यात जावे असे होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. प्रसंगी, 'या वर्षी अमुक धान्याला/फळांना उठाव मिळू शकणार नाही त्याचे उत्पन्न घेऊ नका' असेही सरकारतर्फे सांगितले जाते. आणि शेतकरी हे पाळतात!

७. इस्राएल आज लिंबू-वर्गीय फळांचा, अनेक फुलांचा , भाज्यांचा मोठा उत्पादक देश तर आहेच, शिवाय इतर अनेक प्रकारचा शेतमाल तिथून निर्यात होतो. तसेच तिथल्या गायी जगात दरडोई सर्वात अधिक दूध देतात!
कालवे, नदी, शेततळी इथे काळजीपूर्वक मासे पाळले जातात तर खाऱ्या पाण्यातले मासे भूमध्य आणि गॅलिलि समुद्रातून मिळवले जातात. देशोदेशीचे उत्तम मासे आणून त्यांचे संवर्धन केले जाते.

८. शेतीविषयी नवीन शोध, तंत्रज्ञान आदी माहिती लोकांना मिळावी यासाठी दर 3 वर्षांनी शेतकी प्रदर्शन भरते. या प्रदर्शनासाठी अनेक देशातील तज्ञ आणि चौकस शेतकरी येतात. अनेक जण तिथे पाहिलेले प्रयोग आपल्या शेतीत करतात.

९. *शेतीच नव्हे तर सगळीकडेच सौरऊर्जा, रिसायकलिंग, योग्य उत्पन्न, त्याला योग्य भाव आणि कमी/नगण्य तोटा, पाण्याचा योग्य प्रमाणात वापर आदी मुद्द्यांवर भर दिला जातो.*

१०. मुळात शेती ही निव्वळ भावना गुंतवून करण्याचा व्यवसाय नाही तर बुद्धी, कष्ट, प्रयोगशीलता, तंत्रज्ञान आणि नफा-तोट्याचे गणित लक्षात घेऊन करायचा उद्योग आहे असे तिथे मानले जाते.

*आपल्या शेतकऱ्यांनी बाजाराचे डिमांड-सप्लाय गणित लक्षात घेऊन कर्तव्यकठोर शेती करायला हवी. प्रयोग करून बघायला हवेत. शेततळी, ठिबक सिंचन, ग्रीन हाऊस, उत्तम दर्जाचे वाण, रसायनांचा कमी वापर, फेरपीक, आंतरपिक, मातीची वेळोवेळी तपासणी, सोलर पंप अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून शेती नफ्यात आणून दाखवता येते.*

अवकाळी पाऊस, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ भारतीय माणसाला नवीन नाही. तो शेकडो वर्षे चालत आलेला आहे.
प्रश्न असा आहे की, आपल्याला शेतीचा शाश्वत विकास आणि उपाय हवे असतील तर वरीलप्रमाणे सखोल विचारपूर्वक आधुनिक तंत्रज्ञान च्या साह्याने शेती करणे अत्यंत गरजेचे आहे,

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.